ShareThis

Wednesday, November 2, 2011

(अ)मूल्य-शिक्षण...!


स्थळ : न्यू सिटी हायस्कूल, धुळे
काळ : १९८१ ते १९८६

जेवणाची मोठी सुटी. डबे खाऊन झालेल्या मुलांची दंगामस्ती. वर्गात आधी पोहचण्यासाठी लावलेली शर्यत.
जिन्यावरून धावत जातांना एका मुलाने गम्मत म्हणून जोरात आपटलेला जिन्याचा लोखंडी सरकता दरवाजा. मागून सरांची हाक आणी चिमटीत पकडला गेलेला कान. दुख-या कानात पडलेले आणी कायमसाठी साठवले गेलेले सरांचे मृदू आवाजातले ठाम शब्द...

"हा दरवाजा आणखी किमान २० वर्षे टिकावा अशी आमची इच्छा आहे...!"



मराठी माध्यमाची शाळा. इंग्रजी म्हणजे वाघिणीचे दुध आणी गणिताच्या बरोबरीचा शत्रू क्र. १. स्पेलिंग ही नेहमीच दांडी गुल करणारी गुगली. स्पेलिंग आणी उच्चार यात ताळमेळ असेलच असे नाही. फुरंगटून बसलेल्या मुलासारखे काही स्वर/व्यंजन सायलेंट असण्याची काय गरज. 'नो' असा उच्चार असलेल्या शब्दाचे स्पोलिंग know कसे? या सगळ्या घोळात एक नवीन शब्द शिकवलेला. 'थियेटर'. ही वस्तू चांगलीच ठाऊक आणी 'जवळची' असली तरी ऐनवेळी स्पेलिंग घात करेल ही धास्ती. मुलांची धाकधूक ओळखून आणी कुठलीही गोष्ट घोकंपट्टी करण्यापेक्षा समजून घेण्याची सवय लागावी म्हणून सरांनी त्या शब्दाची अत्यंत सोपी फोड करून जन्मभराची करून दिलेली सोय...

"द अत्रे... The Atre - Theatre...!"


मराठी व्याकरण हे गुंतागुंतीचे किचकट प्रकरण न वाटता ती मौजेची गोष्ट वाटावी या भावनेने सरांनी घेतलेला तास. एका विद्यार्थ्याला उभे करून विचारलेला प्रश्न...
"तू महिन्यातून किती वेळा कटिंग करतोस...?" 
तास मराठीचा आहे कि शारीरिक शिक्षणाचा या संभ्रमात मुलाचे उत्तर
"दोनदा..."
क्षणाचाही विलंब न लावता सरांचा प्रतिप्रश्न... "कुणाची...?" 
मिनिटभराच्या स्मशानशांततेनंतर उडालेला हास्यकल्लोळ. मुलांना शांत करत सरांचे विवेचन...

"करणे आणी करवून घेणे या दोन भिन्न क्रिया असून त्यांचा कर्ताही भिन्नच असायला हवा. मी नाभिक असेल तर या क्रियेचा कर्ता होतो अन्यथा फक्त प्रेरक ठरतो...!"


गणीत...! भल्याभल्यांची झोप उडविणारा आणी परीक्षेच्या खिंडीत गाठून हमखास प्राणार्पण करायला लावणारा गनीम. मुलांच्या मनातील सुप्त भीतीला चारीमुंड्या चीत करण्यासाठी सरांची पहिली क्लुप्ती... गणितात रंगांचा वापर! काळ्याभोर फळ्यावर पांढ-या बरोबरच गुलाबी, नीला, हिरवा, पिवळा आणी केशरी खडू वापरून फळभार पसरलेले गणीत. एखाद्या फुलांच्या ताटव्या सारखे. एखाद्या हुशार पण धसमुसळ्या मुलाने आपण सगळ्यांच्या आधी गणीत सोडवले या भ्रमात असताना, सरांचे कठोर शब्द... 

"त्या आकड्यापुढे काही लिही की गाढवा... दगड, धोंडे, माती... गणितातले कुठलेही उत्तर हे एकक (युनिट) आणी 'हे उत्तर' याशियाय अपूर्ण असते...!"


इतिहासाच्या तासाला स्वातंत्र्यलढ्यापासून सुरु झालेला विषय गौतम बुध्द किंवा कृष्णापर्यंत का आणी कसा गेला याची ना सरांना फिकीर ना मुलांना विवंचना. तासाभरात 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' च्या निरनिराळ्या अध्यायात फेरफटका मारून तास संपायच्या वेळेला सर समेवर आले की 'आता तास संपणार' याची मुलांना रुखरुख. एके दिवशी पाठ्यपुस्तकात कुठेच नसलेल्या विषयावर बोलतांना सर म्हणाले.........

"सनावळ्या पाठ करणे म्हणजे इतिहास नव्हे. कुठल्या घटना कुठे, कधी व कश्या घडल्या याचे अवलोकन आणी त्यांनी येणा-या काळावर केलेला दूरगामी परिणाम म्हणजे इतिहास... इतिहास म्हणजे उगमाचा शोध अन परंपराचा बोध...! आपल्या गावाचे नाव 'धुळे' कसे पडले तर मूळ हिंदी नाव 'धुलिया' वरून आणी धुलिया कसे पडले तर...
आपल्या पांझरेच्या काठी दोन्ही तटांवर जेव्हा मोघल सरदार आपल्या घोड्यांना खरारा करण्यासाठी येत तेव्हा परस्परांची विचारपूस करतांना म्हणत... 'धो लिया?' म्हणजे 'घोडा धुतलास का?' त्या 'धो लिया' चे कालौघात आधी 'धोलिया' आणि मग 'धुलिया' झाले...!"

इतिहासाबद्दल अत्यंत पोटतिडकीने बोलतांना बाजीप्रभूच्या खिंड लढवण्याचा प्रसंगात स्पुरण चढलेले सर स्वत:च बाजीप्रभू व्हायचे आणी प्रत्येक विद्यार्थी 'हर हर महादेव' चा जयघोष करणारा मावळा...! इतिहास शिकविता शिकविता सर स्वत:च इतिहास व्हायचे आणी पानिपतचे वर्णन 'संजय' च्या भूमिकेत शिरून समोर बसलेल्या ६०-६५ धृत्रराष्ट्रांना एकवायचे...!


संस्कृत म्हटले की त्या प्रत्यय चालवण्याच्या विचाराने न चालतच दमायला व्हायचे. घरी सकाळ-संध्याकाळ नवग्रहस्तोत्र, मारुती स्तोस्त्र, अथर्वशीर्ष आणी रामरक्षा म्हणणे एवढ्या भांडवलावर संस्कृतवर प्रभुत्व मिळविणे म्हणजे दिवाळीत उडवायच्या रौकेटने चंद्रावर पोहचण्याचे स्वप्न पाहण्याइतके वेडगळपणाचे लक्षण. पण संस्कृत ही सर्व भाषांचीच नव्हे तर साक्षात आपलीच जननी आहे अशा दृढ विश्वासाने संस्कृतबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रेम व आवड निर्माण करण्यासाठी झटणा-या बाई!याच कारणासाठी प्रथम संस्कृत भाषण आणी मुलांची भीड चेपल्यावर आणी आत्मविश्वास वाढल्यावर संस्कृत नाटकाचा अभिनव उपक्रम करणाऱ्या बाईनी अक्षरश: रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले...! नाटकापुर्वी सर्वांगाला दरदरून फुटलेला घाम आणी 'आपण आयत्यावेळी भाषण विसरणार' या भीतीने पोटात आलेला गोळा...! नाटक संपल्यावर पाध्ये सरांपासून बच्चू शिपायापर्यंत सगळ्यांनी नाटकाची, अभिनयाची आणी अस्खलित उच्चारांची केलेली वाखाणणी. पोटातला गोळा फुग्यातला हेलियम होऊन हवेत तरंगत असल्याची अद्भूत अनुभूती...! 

'या सगळ्या यशाचे आणी कौतुकाचे संपूर्ण श्रेय या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणी दुर्दम्य इच्छाशक्तीला आहे' असे अत्यंत निरलसपणे जाहीर करून स्वत:ला निमित्तापेक्षा अधिक किंमत देण्यास तयार नसलेल्या बाई आणी त्यांच्यासाठी आपण काय केले याची आयुष्यभर खंत करणारा 'तो' विद्यार्थी...!


दरवर्षीप्रमाणे वर्गाचा मौनीटर निवडण्याची वेळ. हुशार, चटपट्या आणी पुढल्या बाकांवर बसणा-यांपैकी कुणीतरी मौनीटर होणार हा मुलांच्या समजुतीतला अलिखित नियम. बरेचशे वर्गशिक्षकही त्याला अपवाद नाही. पण या वर्षीचे सर वेगळ्याच विचारांचे. मौनीटर हा जर वर्गासाठी आहे तर तो वर्गानेच निवडायला हवा. अशा विषयात आपल्याला आवड किंवा मत असू शकते या अनाकलनीय धक्क्यातून सावरण्याच्या आत सरांची घोषणा...

"तुम्हाला योग्य वाटतील त्या मित्रांना तुमचे प्रतिनिधी निवडा आणी गुप्त मतदानाच्या मार्गाने त्यातील एकाची या वर्षभरासाठी मौनीटर म्हणून निवड करण्यात येईल...!"

ध्यानीमनी नसतांना 'आमचा प्रतिनिधी' म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून आलेला 'तो' अजूनही आपल्या
आयुष्यातल्या एकमेव निवडणुकीतील घवघवीत यशाने अचंबित आहे...!


स्थळ : अमुक एक इंग्रजी माध्यमाची शाळा, पुणे
काळ : इ.स. २०११ चा जुलै महिना
"मॉम आम्हाला स्कूलमध्ये व्हैल्यु एज्युकेशनचा सब्जेक्ट कम्पल्सरी आहे म्हणून नोटीस दिलीय... व्हाट इज धिस व्हैल्यु एज्युकेशन? कर्टसी आणी इंटेग्रीटी आणी इक्विटी आणी टोलरन्स आणी ब्ला ब्ला ब्ला, समथिंग लाईक दैट. काय यार भंगार बोर मारतात. नॉनसेन्स...! हे सगळे वर्डस जरा गुगल करून देशील...?"


...मी माझी शाळा का सोडून आलो?
...गुगलेक्चुअल होण्यासाठी कि प्रोफेशनल होण्यासाठी?
...माझी शाळा मला आजीवन विद्यार्थी म्हणून का घेऊ शकत नाही?
...अर्ध्या खाकी चड्डीत खोचलेला पांढरा सदरा वर खेचतांना घंटा होण्याची वाट बघत...?

ज्यांची उत्तरं गुगलही देत नाही अशा या सगळ्या प्रश्नांच्या अनुत्तरीत कल्लोळात आठवणीत हरविलेला मी... निशब्द...!


No comments:

Post a Comment